प्रदीप पाटील
निसर्गाचं भरभरून दान लाभलेला मुळशी
पुणेंशहराच्या पश्चिमेकडील भोर, मुळशी, वेल्हा व मावळ हे सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेले हे तालुके. छत्रपती शिवरायांच्या कालखंडाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले तालुके म्हणून जशी या तालुक्यांची ओळख आहे, तसेच निसर्गाचं भरभरून दान लाभलेले तालुके म्हणूनही या तालुक्यांकडे पाहिले जाते. यातील पुणे शहराला सर्वांत जवळचा असणारा व निसर्गसौंदर्याच्या बाबतीत पुणे जिल्ह्यातील काश्मीर अशी वेगळी ओळख असलेला मुळशी हा तालुका होय. मुळशीचा निसर्ग अवघ्या जगभरातील शहरवासीयांना पर्यटनासाठी भुरळ घालताना दिसतो आहे. बारमाही हिरव्यागार वृक्षराजीने आच्छादलेल्या उंचच्या उंच पर्वतरांगा.. पुणे शहराला व पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाला वर्षभराचे पाणी पुरविण्याची क्षमता असलेले टेमघर, वरसगाव व मुळशी यांसारखी महाकाय धरणं.. मुळा-मुठा यांसारख्या वर्षभर वाहणाऱ्या प्रदूषणविरहित नद्या.. मावळ-मुळशीच्या सीमेवर उभे असलेले व शिवरायांच्या इतिहासाची ओळख करून देणारे तुंग, तिकोना यांसारखे किल्ले… यामुळे साहजिकच इथल्या निसर्गाची शहरवासीयांना भुरळ पडल्यावाचून राहत नाही. इंद्रायणी, आंबेमोहोर यांसारख्या भाताचा आगार व हापूस, रायवळ यांसारख्या आंब्याचा उत्पादक तालुका म्हणूनही मुळशीची ओळख मुंबई व पुणे शहराला आहे. पुणे-महाड महामार्गावरून जात असताना ताम्हिणी घाट परिसरात आपल्याला निसर्गाची विविध रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात. एका बाजूला उंचच उंच डोंगरकडे व दुसऱ्या बाजूने असलेल्या खोल दऱ्या. पावसाळ्यात कोकणच्या बरोबरीने धो-धो पडणारा पाऊस, हिवाळ्यामध्ये दाट धुक्याची शाल पांघरून सजलेले डोंगर, भर उन्हाळ्यातही आपल्या विशाल जलपात्राने गारव्याचा सुखद अनुभव देणारे मुळशी धरणाचे पाणी. याच परिसरात असणारा पळसे येथील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची रीघ लागते. उन्हाळ्यात करवंद , जांभळ , रानसफरचंद यांसारखा रानमेवा आपल्याला मनसोक्त चाखता येतो. भव्य गृहप्रकल्पाबरोबरच चिन्मय विभूती, हाडशी यांसारखी आध्यात्मिक केंद्रे, शेती पर्यटन केंद्रे तसेच मल्हारमाचीसारखा महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या सहकार्याने जलसृष्टी प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला आहे. तालुक्याच्या पश्चिम टोकाला आपण गेलो की, एका उंच ठिकाणी आपण पोहोचल्याचा अनुभव येतो. पावसाळा व हिवाळ्यात धुक्याच्या दुलईत लपून बसलेला तळकोकण आपणाला उन्हाळ्यामध्ये याच ठिकाणावरून डोळे भरून पाहता येतो. पर्यटकांची राहण्याची व खाण्याची हौस भागविण्यासाठी अनेक नामांकित व्यावसायिक मंडळींनी तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेल सुरू केली आहेत. दररोजच्या कामाच्या व्यस्ततेतून एक दिवस तरी विरंगुळा मिळावा यासाठी शनिवार-रविवार या दिवशी अनेक पर्यटक या भागात येऊन जातात.
शहरवासीयाचं सेकंड होम शहरातील दगदग, प्रदूषण, रहदारी या सर्व समस्यांतून आठवड्यातून एकदा तरी आराम मिळावा, या हेतूने अनेक जण भाड्याची घरे घेऊन अथवा स्वत:चं घर घेऊन राहण्यासाठी अलीकडे मुळशीला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे या भागात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे गृहप्रकल्प उभे राहताना दिसत आहेत. याशिवाय निसर्गाच्या आणखीनच जवळ राहता यावं यासाठी काही जण आपापल्या आर्थिक ऐपतीप्रमाणे शेतजमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी फार्म हाऊसेस बांधून राहायला येताना दिसत आहेत. त्यामुळे इथल्या जमिनीला आता सोन्याचा भाव मिळू लागला आहे. १९८० च्या दशकात याच तालुक्यात आंतरराष्ट्रीय आय.टी. पार्क उभं राहण्यास सुरुवात झाली. तसेच पिरंगुट परिसरात उभी राहिलेली एमआयडीसी, यामुळे या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण होताना दिसत आहे. याकरिता या परिसरातील शेतजमिनी व डोंगरराने मोठ्या प्रमाणात संपादित करून त्या ठिकाणी बांधकामे होताना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणून मुळशी तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात एकेकाळी हिरव्यागार असणाऱ्या डोंगरावरील वनराई कमी होऊन त्या जागी सिमेंटची जंगले उभा राहताना दिसत आहेत. भौतिक विकासाच्या नावाखाली व स्वत:च्या स्वार्थापायी का होईना शहरातील माणूस खेड्याकडे येताना दिसत असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे काही दुष्परिणामही दिसू लागले आहेत. मुळशीचे निसर्गसौंदर्य, पर्यावरण व तेथील जीवसृष्टी अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने मागील वर्षीच ताम्हिणीचा हजारो हेक्टरचा परिसर आता ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मुळा नदी
सह्याद्रीच्या कुशीतील मुळा नदीच्या उगमस्थानी वसलेले ऐतिहासिक मुळेश्वर मंदिर
मुळशी तालुक्यासह उजनी धरणाला पाणी पुरवठा करणारी जीवनवाहिनी असलेल्या मुळा नदीचा उगम मुळशी तालुक्यातील वायव्य दिशेचे शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवघर या ठिकाणी होतो.हे गाव मुळशी- मावळ या दोन तालुक्याची जशी सीमा आहे. तसेच पुणे व रायगड या दोन जिल्ह्याची देखील सीमा आहे.
अलीकडील काळात सहारा सिटीमुळे जगाच्या नकाशावर आलेले हे गाव मुळा नदीच्या उगमाचे गाव म्हणून अजूनही बऱ्याच जणांना माहीती नाही. पण येथील गावाकऱ्यांनी व त्यांच्या पूर्वजानी या उगमाच्या स्मृतिचे संवर्धन करुन ठेवलेले आहे.
महाबळेश्वर येथून उगम पावणाऱ्या कृष्णा नदीच्या उगमस्थानी ज्याप्रमाणे कृष्णाईचे प्राचीन मंदिर बांधलेले आहे. त्याच पद्धतीचे छोटेसे मंदिर व गोमूख पूर्वीपासून या ठिकाणी होते.या उगमाच्या शेजारीच मुळेश्वराचे जुने ऐतिहासिक तसेच त्याला जोडूनच अलीकडील काळात त्याचा जीर्णोद्धार करुन नवीन सभामंडपाचे काम देखील करण्यात आले आहे. मुळा नदीच्या उगमाबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये दोन मतप्रवाह असलेले पहायला मिळतात. देवघर गावामध्ये असलेल्या मुळेश्वर मंदिराच्या बारवामधुन जो नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खाली वाहत जातो तो उगम असावा असा एक मतप्रवाह आहे तर या मंदिरापासून पलीकडील बाजूस गावापासून अंदाजे चारशे ते पाचशे मीटरवर स्मशान भूमीच्या शेजारी बारमाही वाहत असलेला एक पाण्याचा झरा हा खरा मुळा नदीचा उगम असल्याचे सांगितले जाते. या दोनही ठिकाणी आता स्थानिक तरुणांनी व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या दोनही उगम स्थानाच्या ठिकाणी स्वछता कार्य तसेच या ठिकाणी बारव करण्याचे कार्य हाती घेतले आहे.
अलीकडील काळात या उगमस्थानाला काही प्रमाणात प्रसिद्धी मिळाल्या मुळे येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहीती उगमस्थानाच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेले स्थानिक कार्यकर्ते राजेंद्र हुंडारे, विलास हुंडारे यांनी दिली.
बारामहिने वाहणारे हे दोनही प्रवाह पुढे आम्बवणे गावाच्या म्हणजे सध्याच्या सहारा सिटीत करण्यात आलेल्या तलावाला जाऊन मिळतात. पुढे हाच प्रवाह मुळा नदी म्हणून ओळखला जातो. हीच नदी पुढे 25 की. मी वाहत आल्यावर निवे,ताम्हिणी कडून येणाऱ्या निळा नदीला मुळशी गावाच्या जवळ मिळते. मुळा आणि निळा या दोन नद्याच्या संगमावर टाटा कंपनीने सुमारे शंभर वर्षांपूर्वी मुळशी धरण बांधले आहे. याच धरणातून आता मुळशी तालुक्यातील अनेक गावांना पिण्यासाठी व नदीकाठच्या गावांना शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. हीच मुळामाई मुळशी धरणात काही काळ स्थिरावल्यानंतर उगमापासून साधारणत : 40 ते 45 की. मी चा प्रवास करून आल्यानंतर पाऊसकाळात शेरे, रावडे आणि पौड येथे उग्र रूप धारण करते. पुढे पुढे तर ती विशाल असे पात्र धारण करते. पिंपरी चिंचवड शहरातून पुढे आल्यावर मुळशी तालुक्यातूनच वाहत येणाऱ्या आपल्या दुसऱ्या बहिणीला म्हणजे मुठा नदीला शिवाजीनगर परिसरात भेटते. या दोघी एकत्रपणे भीमा नदीच्या माध्यमाने उजनी धरणात विलीन होऊन पंढरीला चंद्रभागेच्या माध्यमाने विठ्ठलचरणी लीन झालेल्या पहायला मिळतात. एका अर्थाने मुळेश्वराच्या जवळील गोमुखातून निघालेला हा पाण्याचा प्रवाह जणू काही कानड्या विठ्ठलाला जल अभिषेक करण्यासाठी आणि लाखो भाविकांना स्नान घालुन पवित्र करण्यासाठी निघाला असावा अशी भाविकांची श्रद्धा आहे.
फोटो :
1)देवघर ता. मुळशी येथे मुळा नदीच्या उगमस्थानी बांधलेले मुळेश्वर मंदिर
2) मुळेश्वर मंदिरातील शिवलिंग
3) मुळेश्वर मदिरा शेजारी असलेला बारा महिने वाहनारा उगमस्थानीचा पाण्याचा झरा.
4)मुळेश्वर गावालगत असलेला दुसरा पाण्याचा प्रवाह
शब्दांकन : श्री. प्रदीप पाटील
संकलन सहाय्य : श्री.आकाश मारणे, श्री.सागर शिंदे
