सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कुर्डुपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमध्ये कुर्डाई देवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुर्डुगड असे नाव पडले आहे. जिते गावातून गडावर जाणारी पायवाट २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळेही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुर्डुगडाचा डोंगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन कि.मी. अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे.
घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यापासून भांबर्डे व त्यानंतर अकोले गावलाग ते या गावी घनगडकिल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला फारसा अवघड नसणारा किल्ला मात्र देखणा आहे. या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्व टिकून आहे. वाघजाईचे मंदिर पाण्याच्या टाकीच्या दिशेने जाणारी वाट ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. सदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही गडमाथ्यावर आजही चिलखती बुरुज, काही वाड्याचे अवशेष, पाच-सहा पाण्याची टाकी आहेत. गडावरून सुधागड अप्रतिम दिसतो. तसेच दरीच्या पलीकडे तैलबैलाही सुंदर दिसतो.
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्याला व्हारसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे “डाईक “; तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्टप्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळ भिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे १०१३ मीटर / ३३२२ फूटउंच असून उत्तर – दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर “V ” आकाराची खाच आहे. यामुळे या भिंतीचे २ भागझालेले आहेत. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.