राजेश सातपुते

सर्वप्रथम मुळशी तालुक्याचे हनुमंत चोंधे यांचे अभिनंदन. असा उपक्रम मुळशी मध्ये प्रथमच कोणीतरी करतय आणि ती व्यक्ती आपली मित्रबंधू आहे याच फार मोठं समाधान आहे.
माझा व्यवसाय जरी वकिली असला तरी देखील आठवड्यातले सातही दिवस मी कधी ऑफिस मध्ये उपस्थित राहू शकत नाही वा शकलो नाही. त्याचे कारण म्हणजे माझी असलेली ट्रेकिंग ची आवड. म्हणून काम ५ दिवस आणि ट्रेकिंग २ दिवस हा माझा आठवडाक्रम गेली १२-१३ वर्षे चालू आहे.
जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित केला गेलेला असला तरी तो त्या ठिकाणी असलेल्या लेणी, किल्ले आणि इतिहासामुळे. किंबहुना मुळशीला घाट माथा, जैव विविधता, पारंपरिक घाट रस्ते, गड यासाठी व पर्यायाने पर्यटनासाठी अतिशय संपन्न तालुका म्हणून पाहिले पाहिजे. आपल्या तालुक्याचा पूर्व भाग जरी विकासाने संपन्न असला तरी पश्चिम भाग जो सह्याद्री रांगेचा भाग आहे त्या भागात अतिशय संपन्न इको सिस्टीम, पावसाळ्यात वाहणारे सरस धबधबे, सुपान व्हळ (ओहोळ) ज्याला पर्यटक प्लस व्हॅली किंवा कुंडलिक व्हॅली म्हणून ओळखते, रिंग वॉटर फॉल, देवकुंड धबधब्याकडे जाणारी सावळ्या घाटाची वाट, अंधारबन, तेलबैला, घनगड, कैलासगड, कोराईगड, मंदिरे, देवस्थाने, डोंगर माथ्यावरील देवतांची ठिकाणे आणि असंख्य घाट वाटा अस्तित्वात आहेत. आपण या सगळ्या ठेव्याच संवर्धन करण्याची आज नितांत गरज निर्माण झालेली आहे. असे असले तरी या लेखमालेतून मी माझ्या नजरेने पाहिलेल मुळशी पर्यटन आपल्यापुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.
सध्याचं ट्रेकिंग म्हटलं की उन्हाळ्यामध्ये ट्रेक करणारे हाडाचे ट्रेकर्स आणि पावसाळा आला की बेडकासारखे बाहेर पडणारे ट्रेकर्स असं सर्वसाधारण गणित मांडलं जात. किंबहुना दोन्हीही ऋतु वेग वेगळे असले तरी त्यामध्ये फिरताना ट्रेकर्स मंडळी उन्हाळा आणि पावसाळा यामध्ये सहसा फरक करत नाही. पावसामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी, पाऊस अनुभवण्यासाठी, मौज मजेसाठी फिरत असतात आणि हल्लीच्या सोशल मीडिया जमान्यात त्याच्या छानशा रील तयार करून प्रसिद्धी मिळवत असतात. ट्रेकर मंडळी याकडे जास्त लक्ष देत नाहीत. उन्हाळा आणि पावसाळा या दोन्हीही ऋतुत एकाच परिसरातील ट्रेकिंग ची मजा आणि अनुभव वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने निसर्ग आणि त्यामधील प्रवास अनुभवता हे खूप मह्त्वाचे आहे.
मुळशी तालुक्यात कोकणला जोडणारा ताम्हिणी घाट पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. असे असले तरी ट्रेकर म्हणून मला या घाटापेक्षा या भागमधल्या घाट वाटा नेहमीच भुरळ घालत आलेल्या आहेत. मुळशी तालुक्यात एकापेक्षा एक सरस अशा अनेक घाट वाटा आहेत ज्या मी ट्रेकर म्हणून अगदी एकट्याने अगर मित्रांच्या संगतीने अनेकदा फिरलेलो आहे. ज्यांची माहिती आणि माझे अनुभव कथन या लेखमालेतून केलेला आहे.
देव घाट: लिंग्या घाट : निसनी घाट
घाटावरचे गाव धामण ओहोळ (मुळशी तालुका), घाटाखलील गाव उंबरडी (माणगाव तालुका)
कालावधी : ३-४ तास (वाटेत पाण्याची सोय आहे, किंबहुना पाण्याची टाके सापडणे अवघड असल्याने निदान ३ लिटर पाणी व काही प्रमाणात खाण्यासाठी सोबत असणे आवश्यक)
वाटाड्या : आवश्यक (परत येताना लिंग्या घाट किंवा निसनी घाटाने परत येणे सोयीचे आहे).
ट्रेकचा प्रकार : moderate. अन्य वाटेने परत यायचे झाल्यास पाण्याची पुरेशी सोय असावी किंवा उंबरदी मध्ये पाणी भरून घ्यावे.
ही घाट वाट जरी धामण ओहोळ मधून चालू होत असली तरी ताम्हिणी ते धामण ओहोळ हा अतिशय सुंदर पाय रस्ता आहे जो फक्त जंगलातून जातो. वाटेत धामण ओहोळ बाजूला करवंद, आळू, शिंदोल्या, जांभूळ अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी या मार्गावर प्रवास करण्याची मजा काही वेगळीच आहे. वाटेमध्ये काटेरी झुडपे असल्याने तसेच घाट माथ्यावरून कोकणात उतरताना वातावरण उष्ण होत जात असल्याने पुरेशी काळजी घेणे आवश्यक. शक्यतो सकाळी लवकर ट्रेक चालू करून ट्रेकला सुरवात केल्यास लगतच्या लींग्या घाटाने परत येणे सोयीचे होते.
देव घाट रस्ता तसा पूर्वीपासून दळणवळणाचा रस्ता वापरात असावा याचे काही अवशेष दिसून येतात आणि घाटाखाली कोळी राजाचा पुरातन वाडा असल्याने ही बाब अगदी स्पष्ट होते. देव घाट अगदीच सरळ वाट नसून गावाच्या मागे जाणारी वाट सुरुवातीला पश्चिम बाजूकडे जाऊन कड्याच्या बाजूने लीँग्या घाटाच्या माथ्यावरुन उत्तरेकडे जाते आणि काही वेळाने पुन्हा पश्चिमेकडे वळने घेत नागमोडी वळणाने जाते. वाट मळलेली नसल्याने वाटेत झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. वाट खाली उतरायला सुरुवात करण्यापूर्वी मोठे पठार लागते. त्याला दुर्गाडी म्हणतात. त्याच्या उत्तरेला दिप दरा, साळणाळ, मंडप, पाळणा, चांदीचा होळ हा परिसर दिसून येतो. त्यापुढे किंजल्याचा डोंगर असून दुर्गाडी ला लागून खालील बाजूस असलेल्या टप्प्याला चौर्या म्हणतात. चौऱ्या वरून असलेली नाळ सरळ कोकणात कोळी राजाच्या वाड्याच्या अवशेषांकडे उतरते. दुर्गाडी वरून चौऱ्याकडे जाणारी वाट पूर्ण मोडली असल्याने जाताना कोयता किंवा तत्सम वस्तू असावी. चौऱ्यावर दक्षिण- पश्चिम बाजूस पाण्याचे टाके आहे. त्याचा वापर कधीकाळी पाण्यासाठी होत असावा पण सध्या हे टाके वापरात नसल्याने पिण्यासाठी न वापरलेलं बर. घाट उतरून कोळी राजाच्या वाड्याकडे जाताना असलेल्या ओढ्याला वर्षभर पुरेल इतके जिवंत पाणी उपलब्ध होते. नसल्यास उंबर्दी गाव जास्त लांब नाही. भर उन्हाळ्यात देखील जिवंत पाण्यामुळे या भागातील वाटसरू, भटके, जनावरे आपापली तहान भागवत असल्याचे दिसून येते तर भग्न अवशेष कोळी राजाच्या संपन्नची साक्ष देते. घाटाखालीच असलेला ठेवा आवर्जून पाहण्यासारखा आहे. असंख्य विरघळी, शिल्प, मूर्ती, सतिशीळा याठिकाणी या स्थानाची महती पटवितात. कोळी राजा हे काळनदीच्या उगमावरच वसलेलं गाव जव्हार (पालघर) च्या एका लढाऊ राजघराण्याचं मूळगाव. महादेव कोळी समाजातील देवराम मुकणे उर्फ जयाबा यांनी १३४३ मध्ये स्थापन केलेल्या जव्हारच्या स्वतंत्र राजघराण्याचे मूळगाव उंबर्डी असल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो..
परत येताना उंबार्डी वरून विळे एम आय डी सी बाजूला टमटम वगैरे वाहनाने जाता येते. पण हे अंतर जास्त असल्याने आणि धामण ओहोळ ला गाडी लावलेली असल्यास होणारा त्रास टाळण्यासाठी विळे बाजूला पर्यायी गाडीने जाणे शक्यतो टाळावे.
देवघाट करून कोळी राजाचा भग्न वाडा पाहून उंबरडि गावातील जुने महादेवाचे मंदिर पाहता येईल. किव्वा कोळी राजाच्या भग्न वाड्याचे अवशेष पाहून त्याच्याच दक्षिणेला असलेल्या बाजूने लिंग्या घाटाची वाट धरावी. वाट न सापडल्यास खाली उंबर्डी गावामध्ये स्थानिक ठाकर समाजातील लोकांकडून माहिती घेऊन वाट चढायला सुरुवात करावी. उगाच चुकीच्या वाटेला जाऊन किंवा आतताईपणा करून उभा डोंगर चढायचं टाळावे.
लिंग्या घाट देखील अतिशय सुंदर असून माथ्यावर पोहोण्यापूर्वीच असलेल्या माचीकडून उजवीकडील वाट कुर्डू / विश्राम गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचते तर डावीकडील वाट लिंग्या घाटात येते. उजव्या हाताला कुर्डू गडाकडे गेलेली वाट थोड्याच अंतराने पुन्हा डावीकडे एक वळण घेते ज्या वाटेला निसनीची वाट म्हणतात.
लिंग्या घाटामध्ये अतिशय सुंदर धबधबा असून पावसाळ्यात तो अतिशय भन्नाट दिसतो. घाटात मध्येच एक सुळका वर आलेला असून त्यामुळेच या घाटाला लिंग्या घाट म्हटलं जात अस स्थानिक समजतात. लिंग्या घाट चढताना सुद्धा जुन्या वाटेने अवशेष असल्याचे नजरेस पडते. घाटावर आल्यावर बॉम्बे पॉइंट वरून कोकण भाग पाहता येतो. येथून सूर्यास्त खूप छान दिसतो. तेथून जाणारी वाट सरळ धामण ओहोळ ला येऊन मिळते.

backtotop