निलेश शेंडे

पुण्याच्या पश्‍चिमेकडील घाटमाथा पावसाळ्याच्या दिवसात निसर्गसौंदर्याने नटतो. मुळशी धरणाचा अथांग जलाशय, त्याच्या परिसरातील धबधबे आणि धुक्‍याच्या दुलईने लपलेल्या डोंगररांगा सर्वांनाच आकर्षित करतात. ताम्हिणी घाट आणि पळसे येथील धबधब्यांना पर्यटकांची पहिली पसंती मिळते. या परिसरात जाताना लागणाऱ्या माल्याचा घाटही पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
पावसात चिंब भिजायचे आहे… वीकएंडला धमाल उडवायची आहे… धबधब्यांखाली उभे राहण्याचा आनंद घ्यायचा आहे… निसर्गाचा आविष्कार पाहायचा आणि अनुभवायचा आहे, तर त्यासाठी डोळ्यासमोर नाव येते मुळशीचे. पावसाळ्यात मुळशीला भेट न देणे, हे एखाद्या निस्सीम वारकऱ्याची पंढरीची आषाढी वारी चुकल्यासारखे झाले आहे. वरुणराजाने हजेरी लावली, की भटक्‍यांची पावले आपोआप मुळशीतील हिरवाईच्या जगाची वाट धरतात. धुक्‍याची दुलई, कोसळणारे प्रपात, तेथील हिरवाईची अनेकांना भूल पडते. त्यातून झपाटल्यासारख्या रानवाटा तुडवल्या जातात. बाईकवर स्वार होऊन मुळशीला जायचे भन्नाट बेत कॉलेजच्या कट्ट्यावर आणि कॅंटीनमध्ये आखले जातात. आयटी किंवा इतर ठिकाणचे चाकरमानी मुळशीत जाऊन वीकएंड साजरा करायचे ठरवतात.
ताम्हिणी घाटाच्या परिसरात असलेल्या धबधब्यांच्या दुनियेची मोहिनी पर्यटकांवर आहे. या दुनियेचे प्रवेशद्वार ठरलाय माल्याचा घाट. पुण्याहून ताम्हिणीकडे जाताना माले गावात प्रवेश केल्यानंतर समोरच मुळशी धरणाची अजस्र भिंत दिसते. या भिंतीच्या कडेने थोडेसे पुढे गेल्यानंतर माल्याच्या घाटाला सुरवात होते. पावासाच्या धारा अंगावर घेत घाटाचा काही मार्ग गेल्यावर रस्त्याच्या कडेने आवाज येतो, “भुट्टाऽऽ गरम…’ या दोनच शब्दांनी हुडहुडी पळून जाते आणि गाडी आपोआप त्या आवाजाच्या दिशेने जाते. माल्याच्या घाटात मिळणाऱ्या मक्‍याच्या गरमागरम कणसाची चव पर्यटकांच्या जिभेवर रेंगाळायला लागली आहे. येथील तांबड्या मातीवर एखाद्या झोपडीवजा दुकानात कोळशाची भट्टी टाकलेली असते. या भट्टीतील कोळशाच्या निखाऱ्यावर आपल्या फर्माईशीप्रमाणे मक्‍याची कणसे भाजून मिळतात. त्यावर तिखट-मीठ लावून त्यावर लिंबू पिळले जाते. ते पाहूनच तोंडाला पाणी सुटते. ताम्हिणीला जाणारा पर्यटक या गरमागरम भुट्ट्याची चव घेण्यासाठी येथे क्षणभर थांबतोच.
माल्याच्या घाटातील फक्त गरमागरम भुट्ट्यानेच नव्हे; तर येथील निसर्गसौंदर्याने पर्यटकांना वेड लागले आहे. या घाटातून दिसणारे हिरवेगार शिवार, या शिवारातून आपल्या सर्जा-राजाला ललकारी देणारा बळीराजा, शिवाराच्या एका कडेने वाहणारा नागमोडी ओढा, समोरील डोंगरावर दिसणाऱ्या धुक्‍याच्या लाटा आणि कड्यांवरून कोसळणारे धबधबे पाहून पर्यटक ताजेतवाने होतात. मुळशी धरण पूर्ण भरल्यानंतर दरवाजातून सोडलेले फेसाळते पांढरे शुभ्र पाणीही या घाटातून पाहण्यास मिळते. येथील निसर्ग स्वर्ग सुखाची अनुभूती देतो. त्यासाठी पावसात एक दिवस तरी माल्याला भेट द्यायलाच हवी.

मुळशीतील किल्ले

सह्याद्रीच्या डोंगररांगेत मुळशी तालुका वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळी आपल्या मुळशी तालुक्‍यातील अनेक मावळ्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला. मोसे खोऱ्यातील वीर बाजी पासलकर हे त्यापैकीच एक. स्वराज्य स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान आहे. स्वराज्यावर स्वारी करून आलेल्या शायिस्तेखानाची बोटे लाल महालात घुसून शिवाजी महाराजांनी छाटली होती. या पराक्रमानंतर महाराज आपल्या सहकाऱ्यांसह मुठा- मोसे खोऱ्यात आले होते. अशा या आपल्या ऐतिहासिक मुळशी तालुक्‍यात काही छोटे- मोठे काही किल्ले आहेत. त्यातील आंबवणे येथील कोराईगड आणि काशिग जवळचा तिकोणा किल्ला अनेकांना परिचित आहे, परंतु भांबर्डे- एकोल्याजवळचा घनगड, तैलबेल्याचा दुर्गेश्वर, वडुस्त्याचा कैलासगड आणि मोसे खोऱ्यात असलेला विश्रामगड अद्याप अपरिचित आहेत.

मुळशीतील दैव-दैवते

रामायण-महाभारतातील घटनांचे दाखले देणारी देवस्थाने आपल्या मुळशी तालुक्‍यात आहेत. तालुक्‍यातील गावोगावी भैरवनाथ, महादेव आणि बजरंगबली हनुमानाची मंदिरे आहेत. त्यामुळे प्रत्येक गावाची आपली यात्रा भरत असते. या यात्रेसाठी तमाशा-कुस्तीचे फड रंगतात. पोटापाण्यासाठी पुण्या-मुंबईला गेलेली चाकरमानी दोन तीन दिवस येऊन ग्रामदैवताच्या यात्रेसाठी जमतात.
आपल्या मुळशीत ताम्हिणीची विंझाई, भादस-वाळेणची वाघजाई, शेऱ्याची पद्मावती, पिरंगुटची भवानीमाता आदी देवींची जागृत ठिकाणे आहेत. त्याचप्रमाणे खारावड्याचा म्हसोबा हा आपल्या तालुक्‍याचे दैवत म्हणून ओळखले जाते. या देवस्थानला राज्य सरकारकडून तीथर्क्षत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. येथे राज्यभरातून भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. पळसे, माले, भालगुडी, पौड, जवळ, भुकूम येथील महादेवाची मंदिरे प्रसिद्ध आहेत. पिरंगुटमध्ये पेशवेकालीन गणपती मंदिर आहे. पौडजवळील विठ्ठलवाडी म्हणजे आपल्या मुळशी तालुक्‍याचे प्रतिपंढरपूर आहे. येथे माले येथून दर शुद्ध एकादशीला पायी वारी येत असते. घोटावडे व माण गावाजवळील बापूजीबुवाचे मंदिर तालुक्‍यातील भाविकांचे आराध्यदैवत आहे. भुकूम येथील गणोरेबाबांचा मठ राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हाडशी येथील सत्य साई मंदिर भाविकांबरोबर पर्यटकांचेही आकर्षण ठरले आहे. आयटी नगरी म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी गावात यात्रेवेळी बगाडाचा भव्य कार्यक्रम भरत असतो. यासाठी मानाची काठी आणण्यासाठी येथील भाविक चालत मुळशी धरणातील बार्पे येथे जातात. आज आधुनिक जगातही मुळशीकरांनी आपल्या देव-दैवतांच्या माध्यमातून परंपरा जपल्या आहेत.

मुळशीतील धरणे आणि बंधार

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या मुळशी तालुक्‍याचा बराचसा भाग कोकणाला लागून आहे. तालुक्‍याचा पश्‍चिम भाग म्हणजे एकप्रकारे कोकणकडाच आहे. त्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण मोठे आहे. या भागात 10 हजार मिमी एवढा पाऊस होता. त्यामुळे या भागात धरणे उभारण्यात आली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात टाटा कंपनीने माले गावाजवळ मुळा व निळा नदीच्या संगमावर धरण बांधले. तालुक्‍यातील ते सर्वांत मोठे धरण आहे. या धरणामुळे सुमारे 52 गावे बुडाली. यातील काही गावे शेजारच्या डोंगरावर पुन्हा उभारली गेली, परंतु आकसईसारखी गावे पूर्णपणे काळाच्या आड गेली. आजही मुळशीधरणग्रस्तांना शासनाकडून धरणग्रस्त म्हणून कायद्याने मान्यता दिलेली नाही. त्यासाठी कोणीही आवाज उठवत नाही. इतर धरणग्रस्तांप्रमाणे मुळशीकरांना सवलती मिळणे अपेक्षित आहे. टाटाने बांधलेल्या धरणावर रायगड जिल्ह्यातील भीरा येथे जलविद्युत प्रकल्प आहे. या धरणावर मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे.
मुळशी धरणाच्या दक्षिणेकडील डोंगरांच्या दरम्यान मुठा नदीवर टेमघर येथे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी धरण उभारण्यात आले आहे.
टेमघर धरणाच्या दक्षिणेला वरसगाव धरण आहे. पुणे शहराच्याच पाणी पुरवठ्यासाठी हे धरण उभारलेले आहे. या धरणाच्या पाण्यावर दौंड, हवेली, इंदापूर, पुरंदर येथील पाणी योजना अवलंबून आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील हे मुख्य धरण आहे. या धरणाचा मोठा भाग मुळशी तालुक्‍यातील मोसे खोऱ्यात आहे. आज या धरणाच्या परिसरात लवासा हे हिल स्टेशन उभे राहिले आहे. कासारसाई गावाजवळ एक छोटे धरणही आहे.
या मोठ्या धरणांप्रमाणेच तालुक्‍यात जलसिंचनासाठी शेरे, बेलावडे, उरवडे, मारणेवाडी, रिहे, वाळेण, हाडशी येथे बंधारे तयार केले आहेत.
या बंधारे आणि धरणांमुळे तालुक्‍यातील शेती ओलीताखाली आली आहे, परंतु तालुक्‍यातील जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी अनेक खोऱ्यांमध्ये आजही बंधारे उभारण्याची आणि धरणाद्वारे कालवे किंवा उपसा जलसिंचन योजना राबविण्याची गरज आहे. कारण तालुक्‍यातील खेचरे-मांदेडे खोरे, धरण परिसरांतील गावांत फक्त पावसावर अवलंबूनच पिके घेतली जातात.

मुळशीतील स्वातंत्र्यवीर

मुळशी तालुक्‍याचे स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे स्थान आहे. मुळशी सत्याग्रह या नावाने मुळशीसाठी एक मानाचे पान देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. टाटा कंपनीने इंग्रज सरकारच्या मदतीने मुळशी धरणाचे काम सुरू केले, परंतु त्यासाठी त्यांनी स्थानिक शेतकरयांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचाही योग्य मोबदला मिळाला नव्हता, की त्यांचे योग्य पुनर्वसन केले नव्हते. या अन्यायाविरोधात येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला. त्यासाठी पुण्यातील विनायकराव भुस्कुटे या पत्रकाराच्या मदतीने येथील शेतकरी संघटित झाले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिकारी विचारांचे पांडुरंग महादेव बापट यांनी केले. त्यासाठी त्यांनी आपले क्रांतिकारी विचार बाजूला ठेवून सत्याग्रही विचारावर लढा द्यायला सुरवात केली. या आंदोलनातच त्यांना सेनापती ही पदवी बहाल करण्यात आली. पुढे सेनापती बापटांनी या आंदोलनात क्रांतिकारी विचार आणले. त्यातून शेरे व पौड येथे रेल्वेचे रूळ उखडण्यात आले. मुळशी सत्याग्रहाच्या या लढ्यात मोसे खोऱ्यातील पळसे येथील तुकाराम गेणू हळंदे व सावळा विठ्ठल हळंदे, शेऱ्याचे देवराम पांडुरंग देशमुख, उरवड्याचे माधव पुर्षोत्तम पोतनीस, माण येथील विश्‍वनाथ नरहर बर्वे, पिरंगुटमधील पंढरीनाथ रामचंद्र गणवरे, भडवलीचे भीमराम तुकाराम साबळे, पडळघरचे चिंतामण नारायण देशपांडे यांचेही यांचेही मोलाचे योगदान आहे. यांच्या बरोबरीनेच काही अज्ञात व्यक्तींनीही या लढ्यात सहभाग घेतला. त्यात ताम्हिणी येथील धनगर समाजातील एक व्यक्तीने लढा उभारला होता. इतिहासाच्या पानात अशा अनेक व्यक्ती आजही अज्ञातच आहेत. स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ पौड येथे स्तंभ उभारला असून, माले येथे सेनापती बापट स्मारक स्तंभाची उभारणी केलेली आहे.

मुळशीतील सामाजिक संस्था

मुळशी तालुका एकेकाळी पुणे जिल्ह्यातील एक मागास तालुका म्हणून ओळखला जायचा. आज तालुक्‍याची ही ओळख बदलली आहे. तालुक्‍याच्या विकासात ज्या घटकांचा वाटा आहे, त्यात काही सामाजिक संस्थांनीही आपली भूमिका बजावली आहे. पिरंगुट येथे मतिमंद मुलांसाठी केंजळे सरांनी शाळा सुरू केली. त्याचप्रमाणे कोळवण खोऱ्यात साधना व्हिलेज ही संस्थाही मंतिमंदासाठी काम करत आहे. अण्णा भरेकर मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी खारावडे येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. आतापर्यंत या सोहळ्यात पाचशेच्यावर विवाह झाले आहेत. त्यातून हजारपेक्षा जास्त कुटुंबे सुखी झाली आहेत. एकप्रकारे अण्णा भरेकरांनी तालुक्‍यात सामुदायिक विवाह सोहळा चळवळ रुजवली आहे. त्यांचे अनुकरण करून या सोहळ्यातील एक कार्यकर्ते तात्यासाहेब देवकर यांनी घोटावडे गावातही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करायला सुरवात केली आहे. अनिल पवार, महेश मालुसरे या आपल्या मुळशीतील युवकांनी किल्ले संवर्धनासाठी सह्याद्री गर्जना हा संस्था उभारली आहे. त्या माध्यमातून त्यांनी किल्ले भ्रमंती, किल्ल्यांची स्वच्छता आदी उपक्रम राबविले आहेत. शिवाजी ट्रेलसारख्या संस्थेने तालुक्‍यातील घनगड, तिकोना या किल्ल्यांची डागडुजी केली आहे. विजयाताई लवाटे यांनी भूकूमजवळ मानव्य ही एड्‌सग्रस्त मुलांनी शाळा सुरू केली आहे.

मुळशीतील शिक्षण संस्था

मुळशी तालुका एकेकाळी शिक्षणाच्या दृष्टीने मागास तालुका होता. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा शेजार लाभूनही तालुका शिक्षणापासून दूर होता, परंतु गेल्या काही वर्षापासून तालुक्‍यात शिक्षणाच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत.
अनिल व्यास यांनी सर्वांगीण ग्रामीण विकास या संस्थेच्या माध्यमातून माले व शिळेश्वर येथे आदिवासी व इतर मुलांसाठी मोफत वसतिगृह आणि असदे येथे शाळा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे ताम्हिणी येथे सह्याद्री शिक्षण संस्थेने, माले, खेचरे व वांद्रे येथे मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाने, कोराईगड शिक्षण संस्थेने आंबवणे येथे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने शेरे, पोडे, घोटावडे, कोळवण, पिरंगुट, मुठा येथे शाळा सुरू केल्या. या संस्थेने पिरंगुटमध्ये वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले आहे. त्यांचे पौड व पिरंगुटमध्ये कनिष्ठ महाविद्यालयही आहे. मामासाहेब मोहोळ क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोमगाव, उरवडे, भूगाव, रिहे येथे शाळा आहे. त्यांचे पिरंगुटमध्ये आयटीआय आणि एमबीए महाविद्यालयही आहे. पिरंगुटमध्ये डीएड महाविद्यालय सुरू झाले आहे.
खुबवलीजवळील डोंगरावर महिंद्रा युनायटेड हे विश्व महाविद्यालय 15 वर्षापूर्वीच स्थापन झाले. तेथेच शेजारी रावडे गावाच्या डोंगरावर रिव्हरडेल ही आतंरराष्ट्रीय शाळा सुरू झाली. लवासा कंपनीने खोऱ्यातील मुलांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू केली आहे. पिरंगुट, पौड, लवळे, सूस, भूगाव येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्या आहेत. भूगावमध्ये श्री श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेची शाळा आहे. येथे जवळच संस्कृती विद्यालय आहे. एकंदर तालुक्‍यात शिक्षणाची गंगा जोरात वाहत आहे.

मुळशीतील शेती

मुळशी तालुक्‍याचा पश्‍चिमेकडील भाग दुर्गम डोंगरांचा आणि पूर्वेकडील भाग तसा डोंगराचा असला तरी कमी पावसाचा आहे. त्यामुळे पश्‍चिमेकडील म्हणजे मुळशी धरण भाग, मुठा, माले, मोसे, रिहे आणि कोळवण खोऱ्यातील शेतकरी प्रामुख्याने भाताचे पीक घेतात. मासे व मुळशी धरण भागात फक्त भाताचे पीक घेतले जाते. तालुक्‍यातील इंद्रायणी आणि आंबेमोहोर तांदळाला मोठी मागणी आहे. या भागातील आदिवासी आणि धनगर समाजातील शेतकरी डोंगरांवर नाचणी आणि वरईचे पीक घेतो. मुठा, माले, रिहे आणि कोळवण खोऱ्यातील शेतकरी आता भाताबरोबरच उसाचेही उत्पादन घेऊ लागला आहे. खेचरे-मांदेडे खोऱ्यातही बारमाही पाण्याची सोय नसल्याने या भागातील शेतकरी फक्त भाताचे पीक घेतो. या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावलेल्या आंबा पिकाचे त्याला चांगले उत्पादन मिळते. पिरंगुट, घोटावडे, लवळे परिघातील शेतकऱ्यांनी तरकारी पिकांवर भर दिला आहे. त्यात लवळे गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्यामुळे एक लवळे आणि बारा मावळं अशी म्हण प्रचलित झाली आहे. नांदे परिसरातील शेतकऱ्यांनी लॉन घेण्यास सुरवात केली आहे. मुळशीचा ऍग्रो आयडॉल असलेल्या ज्ञानेश्वर बोडके यांच्या प्रयत्नातून तालुक्‍यात ठिकठिकाणी पॉलिहाऊस उभारले आहेत. त्यातून शेतकरी आधुनिक पद्धतीने फूल शेती करत आहे.

मुळा मुठा :

महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील सु. 128 किमी. लांबीची भीमा नदीची उपनदी. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला पुणे शहरापासून मुळा-मुठा अथवा मुळा हे नाव प्रचलित आहे. ही पूर्ववाहिनी नदी दौंडच्या वायव्येस सु.27 किमी. वर रांजणगाव सांडस येथे भीमा नदीला उजवीकडून मिळते.

मुळा नदी

उत्तरेकडील मुळा नदी बोर घाटाच्या दक्षिणेस सु. 13 ते 15 किमी. लांबीच्या प्रदेशातून सह्याद्रीच्या रांगेत उगम पावणाऱ्या सु. सात प्रवाहांपासून बनते. पौड गावाच्या पूर्वेस सु. 8 किमी. वरील लवळे गावापर्यत हे सर्व प्रवाह एकत्र येतात. पौड भागात या नदीमुळेनिर्माण झालेली दरी पौड खोरे या नावाने प्रसिद्ध आहे. लवळे गावापासून अनेक वळणे घेत ही नदी पुणे शहराच्या उत्तरेस कळस येथे दक्षिणवाहिनी बनते व पुणे शहराच्या मध्यभागी तिला दक्षिणेकडून मुठा नदी मिळाल्यांनतर ती पूर्वेस वहात जाते. पवना ही तिला डावीकडून मिळणारी प्रमुख उपनदी आहे. मुळशी तालुक्‍यात (उगमाकडील भागात) मुळशी गावाजवळ निळा व मुळा या नद्यांच्या संगमावर टाटा पॉवर कंपनीने धरण बांधले असून त्या धरणातील पाणी, 4.8 किमी. लांबीच्या बोगद्याद्वारे भ्‌रिा (रायगड जिल्हा) येथील विद्युत्‌ केंद्रात नेण्यात आले आहे. त्यामुळे मुळशी पेट्यातील धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सत्याग्रह करण्यात आला (1921-24). त्याचे नेतृत्व स्‌ेनापती बापट यांनी केले होते.

मुठा नदी

मुठा नदी जिल्ह्याच्या नैर्त्य भागात सह्याद्रीच्या रांगेत सस. पासून सु. 912 मी. उंचीवर उगम पावून ईशान्य दिशेने वाहत जाते. अंबी व मोसी हे तिचे उगमाकडील प्रमुख प्रवाह आहेत. या नदीच्या उगमप्रवाहावर प्‌ानशेत येथे धरण बांधले आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात या नदीने डोंगराच्या तीव्र उतारावर अरुंद दरी निर्माण केली असून हा मुठा खोरे म्हणून ओळखला जातो. नदीचा बराचसा भाग धरणांच्या जलाशयांनी व्यापलेला आहे. खडकवासला येथील धरणानंतर ही नदी पर्वती टेकडीच्या बाजूने पुढे जाऊन शहराच्या मध्यभागी मुळा नदीला मिळते. मुठा नदीवरील खडकवासला येथील धरणातून कालव्यांद्वारे पुणे शहरास आणि जिल्ह्यातील शेतीस पाणीपुरवठा केला जातो.

मुळा-मुठा नदी

पुणे शहराच्या पुढे पूर्वेस वाहणारी मुळा-मुठा नदी मांजरी बु. ते थेऊर यांदरम्यान एक मोठे वळण घेते व नागमोडी वळणांनी वहात जाऊन दौंड तालुक्‍याच्या पूर्व सरहद्दीवर रांजणगाव सांडस येथे भीमा नदीस मिळते. नदीकाठावरील पुणे, मांजरी, थेऊर इ. गावे औद्योगिक, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत.

backtotop