डोंगरवाडी जवळील दरी मध्ये बेरजेच्या आकाराचे दरी तयार झाली. त्यालाच पर्यटक प्लस व्हॅली म्हणतात. येथे पाण्याचे कुंड पहायला मिळतात. याच परिसरात मिल्कीबार धबधबा आहे. पाण्याचा प्रवाह दगडावर शुभ्र दुधाळ बनतो यामुळे मिल्कीबार धबधबा नाव पडले आहे. तर याच प्लस व्हॅलीच्या कुंडातून खाली पडणा-या पाण्यामुळे प्रसिध्द देवकुंड धबधबा तयार होतो. रिंग वॉटर फॉल शेकडो वर्षे पाण्याच्या प्रवाहामुळे दगडाला गोल रिंगच्या आकार आल्याचे या धबधब्याचे परिसरात अनेक ठिकाणी दिसुन येते. या रिंग मधुन पास होत पर्यटक पाण्याच्या प्रवाहाचा आनंद लुटतात.
पेठशहापुर-आंबवणेचा कोराईगड हा किल्ला लोणावळयाजवळ असल्याने शनिवार, रविवार सुटीच्या दीवशी पर्यटकांचा मोठया प्रमाणात राबता असतो. पेठशहापुर, आंबवणे अशा दोनही गावांतून किल्लावर जाता येता. सहारा सिटी अॅंबी व्हॅली याच परिसरात वसवण्यात आली आहे.
अॅंबी व्हॅलीतून परवानगी घेऊन पाय-यांनी किल्ल्यावर जाता येते. अवघड श्रेणीतील नसल्याने लहानांसह, जेष्ठ नागरीकही क्षमतेनुसार किल्ल्यावर जाऊ शकतात.
किल्ल्यावरचे सपाट विस्तीर्ण पठार, शाबुत तटबंदी, पाण्याचे दोन तलाव, लहान-मोठया लोखंडी तोफा, बुरुंज, गडदेवता कोराई देवीचे मंदीर, गणेश मंदीर
अशा अनेक गोष्टी पाहता येतात.
एकोलेचा घनगड गोमुखी रचनेचे प्रवेशद्वार, कातळातून निसटलेला कडा, खांबयुक्त पाण्याचे टाके, दोनमजली रचनेचा बुरुज, भुयारी टाके, नैसर्गिकरित्या मारखिंडीमध्ये झालेली दगडांची ठेवण, वाघजाई देवीची मुर्ती, कातळात कोरलेले पाण्याचे टाके पाहता येतात. गडावरुन सुधागड, सरसगड, सुरगड, तैलबैला हे किल्ले दिसतात.
वाघजाई घाट, सवाष्णी घाट, माणदान घाट, घोणदांड घाट, निमखोडयाची खिंड, गणेश खिंड, लिबाईचे सुळके, घोण्या डोंगर, नाळीची वाट, डे-याचा घाट, गाढवलोट, किवनी पठार द-या नदी, घोडेजीन घाट, चिमादेवीची व्हळ दीसतात. खडसांबळे लेणी, थणाळे लेणी येथे जाता येते.
वडुस्तेचा कैलासगड पावसाळयाच्या शेवटी, हिवाळा, उन्हाळयात कैलासगडावरुन मुळशी धरणाचे विहंगम दृश्य डोळयांचे पारण फेडते. टेहळणीसाठी वापरण्यात आलेल्या या गडावर पाण्याचे टाके, शिवमंदीर, जुन्या घरांची जोती पाहता येतात. गडावर जाण्यासाठी पाय-या नसुन अवघड, निसरडया पायवाटेने जावे लागते.
तैलबैलाचे नैसर्गीकरित्या तयार झालेले कातळ सुळके प्रस्तरोहणाची आवड असलेल्या गिर्यारोही, पर्यटकांना आकर्षित करतात.
सवाष्णी घाट, सावळया घाट, मारखिंड ही अनुभवी ट्रेकर्ससाठीची वेगळी वाट.