प्राचीन सावळ्या घाट

आकाश मारणे

मुळशी तालुक्यातील प्राचीन सावळ्या घाट पाहिलाय का तुम्ही?

पुर्वीच्या काळात म्हणजे अगदी सातवाहन, प्रतिष्ठानच्या (प्रतिष्ठान म्हणजे पैठण), आणि त्याही पुर्वी प्राचीन भारताचा समुद्र मार्गे जगातील इतर देशांशी व्यापार व्हायचा. आपली सह्याद्रीची रांग भारताचे प्रामुख्याने दोन भाग करते. पहिला म्हणजे देश – याचा अर्थ सह्याद्री रांगेच्या पुर्वेकडील प्रदेश (पश्चिम महाराष्ट्र व बाकी सगळा भारत देश) आणि दुसरा भाग म्हणजे कोकण. कोकणातील माणूस जर घाट चढून वर येत असेल, तर तो म्हणायचा “देशावर चाललोय”!

कोकणात समुद्र किनाऱ्यावरील विविध बंदरांतून व्यापार व्हायचा. देश व कोकण यांना जोडणाऱ्या अनेक घाटवाटा अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. असाच एक घाट म्हणजे आपल्या मुळशी तालुक्यातील सावळ्या घाट.

या घाटात आपणास आजही कोरीव पायऱ्या, पाण्याच्या टाक्या अशा प्राचीन खाणाखुणा दिसतात. घाटावरील लोक व कोकणातील घाटाच्या तळाशी असलेले लोक आजही या घाटवाटांनी ये-जा करीत असतात.

ठिकाण

पराते वस्ती (वाडी), पिंप्री गाव, मुळशी तालुका. मुळशी धरणाला लागून कोकणाकडे जाताना, निवे गावाच्या पुढे लोणावळ्यासाठी उजवीकडे फाटा फुटतो. त्या रस्त्याने एक किमी गेल्यास, डावीकडे पराते वाडीकडे जाणारा सिमेंटचा रस्ता आहे. पराते वाडीमध्ये गाडी पार्क करून तुम्ही घाट पहायला जाऊ शकता.

ऐतिहासिक मुळशी तालुक्यातील घाटवाटा

इसवीसन पूर्व पासून भारताचा इतर देशांशी व्यापार चालत आला आहे. कोकणातील बंदरातून हा व्यापार चालत असे आणि आजही चालतो. यात सह्याद्रीचे खूप मोठे योगदान आहे. हा सह्याद्रीच देशाचे दोन भाग करतो – एक कोकण आणि दुसरा देश. कोकणातून व्यापारी आपला माल विक्रीसाठी देशावर घेऊन येत असत. त्यांना देशावर येताना याच सह्याद्रीमध्ये अनेक घाटवाटा तयार केल्या आहेत. त्यातील मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या काही घाटवाटांविषयी माहिती घेऊया.

वाघजाई घाट

मुळशी तालुक्यातील तैलबैल हे एका शेवटच्या टोकावरील गाव. याच गावातून वाघजाई घाट जातो. निसर्गाने भरभरून दिलेल्या मुळशी तालुक्यातील हे एक प्रेक्षणीय ठिकाण.

घाट उतरताना आपल्याला सुरुवातीलाच काही कातळ कोरीव व दगडी पायऱ्या आढळून येतात. पुढे थोड्या अंतरावर आपल्याला वाघजाई देवीचे छोटे मंदिर दिसते. याच देवीच्या नावाने या घाटाचे नाव वाघजाई घाट पडले असावे. पुढे गेल्यावर आपल्याला दोन ठिकाणी वीरांचे स्मारक दिसते.

ही वाट दोन भागांमध्ये विभागते – एक वाट कोकणातील ठाणाळे गावाकडे जाते आणि दुसरी ऐतिहासिक पण दुर्लक्षित ठाणाळे लेण्यांकडे. लेणीमधील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. येथे सम्राट अशोककालीन काही नाणी सुद्धा सापडली आहेत.

या लेण्यांच्या रक्षणासाठी घाट माथ्यावर तैलबैल हा घाट रक्षक मोठ्या थाटात उभा आहे. घाट उतरल्यावर जवळच सुधागड किल्ला आहे. कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला राजधानी करण्याचा विचार केला होता. मात्र, उंची कमी असल्याने राजधानी रायगडावर करण्यात आली. एकदा तरी आवश्य भेट द्या या ऐतिहासिक वाघजाई घाटाला.

सावळ्या घाट

इसवीसन पूर्व 250 ते इसवी सन 250 या काळात महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सातवाहन राजांची सत्ता होती. प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण ही सातवाहन राजांची राजधानी होती, तर जुन्नर हे एक वैभवशाली शहर म्हणून नावाजले होते. याच सातवाहन काळात अनेक घाट मार्ग विकसित झाले, त्यातीलच एक सावळ्या घाट.

या घाटामध्ये गेल्यावर आपल्याला पाच कातळात कोरलेली पाण्याची टाके व 32 कोरीव पायऱ्या अजूनही दिसतात. यातील चार टाके या खांब टाके स्वरूपाच्या असून यामुळे या घाटाचे काम हे सातवाहन काळात झाले, हे निश्चित होते. अशाच प्रकारच्या खांब टाके आपल्याला जुन्नर जवळील नाणेघाट येथेही दिसतात.

ही घाटवाट भिरे गावातून सुरू होते आणि निवे गावातील पराते वस्ती येथे संपते. या घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी जवळच कैलासगड किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. या गडावरही सातवाहन कालीन खांब टाके आहेत.

मुळशी तालुक्यातील या ऐतिहासिक सावळ्या घाटात श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे ही संवर्धनाचे काम करत असते. आपणही ही घाटवाट एकदा तरी पाहावी आणि आपला तालुका ऐतिहासिक दृष्ट्या किती समृद्ध आहे, हे सर्वांना अभिमानाने सांगावे.

धन्यवाद.
माहिती लेखन संकलन: आकाश मारणे
मुळशीची सौंदर्यरत्ने

backtotop