मुळशीतील सामाजिक संस्था
मुळशी तालुका एकेकाळी पुणे जिल्ह्यातील एक मागास तालुका म्हणून ओळखला जायचा. आज तालुक्याची ही ओळख बदलली आहे. तालुक्याच्या विकासात ज्या घटकांचा वाटा आहे, त्यात काही सामाजिक संस्थांनीही आपली भूमिका बजावली आहे. पिरंगुट येथे मतिमंद मुलांसाठी केंजळे सरांनी शाळा सुरू केली. त्याचप्रमाणे कोळवण खोऱ्यात साधना व्हिलेज ही संस्थाही मंतिमंदासाठी काम करत आहे. अण्णा भरेकर मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी खारावडे येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. आतापर्यंत या सोहळ्यात पाचशेच्यावर विवाह झाले आहेत. त्यातून हजारपेक्षा जास्त कुटुंबे सुखी झाली आहेत. एकप्रकारे अण्णा भरेकरांनी तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळा चळवळ रुजवली आहे. त्यांचे अनुकरण करून या सोहळ्यातील एक कार्यकर्ते तात्यासाहेब देवकर यांनी घोटावडे गावातही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करायला सुरवात केली आहे. अनिल पवार, महेश मालुसरे या आपल्या मुळशीतील युवकांनी किल्ले संवर्धनासाठी सह्याद्री गर्जना हा संस्था उभारली आहे. त्या माध्यमातून त्यांनी किल्ले भ्रमंती, किल्ल्यांची स्वच्छता आदी उपक्रम राबविले आहेत. शिवाजी ट्रेलसारख्या संस्थेने तालुक्यातील घनगड, तिकोना या किल्ल्यांची डागडुजी केली आहे. विजयाताई लवाटे यांनी भूकूमजवळ मानव्य ही एड्सग्रस्त मुलांनी शाळा सुरू केली आहे.
मुळशीतील शिक्षण संस्था
मुळशी तालुका एकेकाळी शिक्षणाच्या दृष्टीने मागास तालुका होता. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा शेजार लाभूनही तालुका शिक्षणापासून दूर होता, परंतु गेल्या काही वर्षापासून तालुक्यात शिक्षणाच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत.
अनिल व्यास यांनी सर्वांगीण ग्रामीण विकास या संस्थेच्या माध्यमातून माले व शिळेश्वर येथे आदिवासी व इतर मुलांसाठी मोफत वसतिगृह आणि असदे येथे शाळा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे ताम्हिणी येथे सह्याद्री शिक्षण संस्थेने, माले, खेचरे व वांद्रे येथे मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाने, कोराईगड शिक्षण संस्थेने आंबवणे येथे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने शेरे, पोडे, घोटावडे, कोळवण, पिरंगुट, मुठा येथे शाळा सुरू केल्या. या संस्थेने पिरंगुटमध्ये वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले आहे. त्यांचे पौड व पिरंगुटमध्ये कनिष्ठ महाविद्यालयही आहे. मामासाहेब मोहोळ क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोमगाव, उरवडे, भूगाव, रिहे येथे शाळा आहे. त्यांचे पिरंगुटमध्ये आयटीआय आणि एमबीए महाविद्यालयही आहे. पिरंगुटमध्ये डीएड महाविद्यालय सुरू झाले आहे.
खुबवलीजवळील डोंगरावर महिंद्रा युनायटेड हे विश्व महाविद्यालय 15 वर्षापूर्वीच स्थापन झाले. तेथेच शेजारी रावडे गावाच्या डोंगरावर रिव्हरडेल ही आतंरराष्ट्रीय शाळा सुरू झाली. लवासा कंपनीने खोऱ्यातील मुलांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू केली आहे. पिरंगुट, पौड, लवळे, सूस, भूगाव येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्या आहेत. भूगावमध्ये श्री श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेची शाळा आहे. येथे जवळच संस्कृती विद्यालय आहे. एकंदर तालुक्यात शिक्षणाची गंगा जोरात वाहत आहे.
मुळशीतील शेती
मुळशी तालुक्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम डोंगरांचा आणि पूर्वेकडील भाग तसा डोंगराचा असला तरी कमी पावसाचा आहे. त्यामुळे पश्चिमेकडील म्हणजे मुळशी धरण भाग, मुठा, माले, मोसे, रिहे आणि कोळवण खोऱ्यातील शेतकरी प्रामुख्याने भाताचे पीक घेतात. मासे व मुळशी धरण भागात फक्त भाताचे पीक घेतले जाते. तालुक्यातील इंद्रायणी आणि आंबेमोहोर तांदळाला मोठी मागणी आहे. या भागातील आदिवासी आणि धनगर समाजातील शेतकरी डोंगरांवर नाचणी आणि वरईचे पीक घेतो. मुठा, माले, रिहे आणि कोळवण खोऱ्यातील शेतकरी आता भाताबरोबरच उसाचेही उत्पादन घेऊ लागला आहे. खेचरे-मांदेडे खोऱ्यातही बारमाही पाण्याची सोय नसल्याने या भागातील शेतकरी फक्त भाताचे पीक घेतो. या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावलेल्या आंबा पिकाचे त्याला चांगले उत्पादन मिळते. पिरंगुट, घोटावडे, लवळे परिघातील शेतकऱ्यांनी तरकारी पिकांवर भर दिला आहे. त्यात लवळे गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्यामुळे एक लवळे आणि बारा मावळं अशी म्हण प्रचलित झाली आहे. नांदे परिसरातील शेतकऱ्यांनी लॉन घेण्यास सुरवात केली आहे. मुळशीचा ऍग्रो आयडॉल असलेल्या ज्ञानेश्वर बोडके यांच्या प्रयत्नातून तालुक्यात ठिकठिकाणी पॉलिहाऊस उभारले आहेत. त्यातून शेतकरी आधुनिक पद्धतीने फूल शेती करत आहे.
मुळा मुठा :
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील सु. 128 किमी. लांबीची भीमा नदीची उपनदी. जिल्ह्याच्या पश्चिम भागात उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला पुणे शहरापासून मुळा-मुठा अथवा मुळा हे नाव प्रचलित आहे. ही पूर्ववाहिनी नदी दौंडच्या वायव्येस सु.27 किमी. वर रांजणगाव सांडस येथे भीमा नदीला उजवीकडून मिळते.
मुळा नदी
उत्तरेकडील मुळा नदी बोर घाटाच्या दक्षिणेस सु. 13 ते 15 किमी. लांबीच्या प्रदेशातून सह्याद्रीच्या रांगेत उगम पावणाऱ्या सु. सात प्रवाहांपासून बनते. पौड गावाच्या पूर्वेस सु. 8 किमी. वरील लवळे गावापर्यत हे सर्व प्रवाह एकत्र येतात. पौड भागात या नदीमुळेनिर्माण झालेली दरी पौड खोरे या नावाने प्रसिद्ध आहे. लवळे गावापासून अनेक वळणे घेत ही नदी पुणे शहराच्या उत्तरेस कळस येथे दक्षिणवाहिनी बनते व पुणे शहराच्या मध्यभागी तिला दक्षिणेकडून मुठा नदी मिळाल्यांनतर ती पूर्वेस वहात जाते. पवना ही तिला डावीकडून मिळणारी प्रमुख उपनदी आहे. मुळशी तालुक्यात (उगमाकडील भागात) मुळशी गावाजवळ निळा व मुळा या नद्यांच्या संगमावर टाटा पॉवर कंपनीने धरण बांधले असून त्या धरणातील पाणी, 4.8 किमी. लांबीच्या बोगद्याद्वारे भ्रिा (रायगड जिल्हा) येथील विद्युत् केंद्रात नेण्यात आले आहे. त्यामुळे मुळशी पेट्यातील धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सत्याग्रह करण्यात आला (1921-24). त्याचे नेतृत्व स्ेनापती बापट यांनी केले होते.
मुठा नदी
मुठा नदी जिल्ह्याच्या नैर्त्य भागात सह्याद्रीच्या रांगेत सस. पासून सु. 912 मी. उंचीवर उगम पावून ईशान्य दिशेने वाहत जाते. अंबी व मोसी हे तिचे उगमाकडील प्रमुख प्रवाह आहेत. या नदीच्या उगमप्रवाहावर प्ानशेत येथे धरण बांधले आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात या नदीने डोंगराच्या तीव्र उतारावर अरुंद दरी निर्माण केली असून हा मुठा खोरे म्हणून ओळखला जातो. नदीचा बराचसा भाग धरणांच्या जलाशयांनी व्यापलेला आहे. खडकवासला येथील धरणानंतर ही नदी पर्वती टेकडीच्या बाजूने पुढे जाऊन शहराच्या मध्यभागी मुळा नदीला मिळते. मुठा नदीवरील खडकवासला येथील धरणातून कालव्यांद्वारे पुणे शहरास आणि जिल्ह्यातील शेतीस पाणीपुरवठा केला जातो.
मुळा-मुठा नदी
पुणे शहराच्या पुढे पूर्वेस वाहणारी मुळा-मुठा नदी मांजरी बु. ते थेऊर यांदरम्यान एक मोठे वळण घेते व नागमोडी वळणांनी वहात जाऊन दौंड तालुक्याच्या पूर्व सरहद्दीवर रांजणगाव सांडस येथे भीमा नदीस मिळते. नदीकाठावरील पुणे, मांजरी, थेऊर इ. गावे औद्योगिक, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत.