मकरंद ढमाले

वर्धापन दिन पर्यटन लेख मुळशी पुणे जिल्‍हयाचे मिनी महाबळेश्‍वर

माले, ता.२८ ः वर्षाविहारासाठी प्रसिध्‍द असलेल्‍या मुळशी मध्‍ये हिवाळा, उन्‍हाळा या ऋतुंतही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मुळशी तालुक्‍याला लाभलेलं निसर्ग सौंदर्य, किल्‍ले, घाटवाटा, दरी, घनदाट जंगले, झाडी, मुळशी धरणाच्‍या जलाशयाचा परिसर, ऐतिहासिक ठिकाणे यामुळे पर्यटकांची पसंती मिळत आहे. भटकंती करताना ट्रेकिंग, कॅंम्पिंगचा आनंद लुटताना मोठया संख्‍येने पर्यटक दिसून येतात. गर्दीने वर्षभर गर्दीने गजबजलेली पर्यटनस्‍थळे, यामुळे पर्यटनात मोठी वाढ होत आहे.
पावसाळयात पावसाचे तुषार, धबधबे, पाण्‍याने भरुन वाहणारे, ओढे-नाले, मुळशी धरणाचे जलाशय, हिरवेगार डोंगर, गवतांचे गालिचे तर थंडीच्‍या मोसमात आल्‍हाददायक वातावरणातील निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटक मुळशीकडे वळतात. ऐतिहासिक व निसर्गरम्‍य ठिकाणे मुळशी तालुक्‍याच्‍या पश्चिम पटटयाचा, धरण भागाचा तालुक्‍याच्‍या पर्यटन वाढीत मोठा वाटा आहे. पुणे जिल्‍हयाचे मिनी महाबळेश्‍वर म्‍हटले तर वावगे ठरणार नाही.
पिंपरीचे अंधारबन म्‍हणजे कुंडलिका दरीच्‍या परिसरातील घनदाट जंगल. हे जंगल पुर्वी इतके घनदाट होते की सुर्याचा प्रकाशही झाडा झुडपांमुळे जमिनीवर पोचत नसे. त्‍यामुळे जंगलास अंधारबन हे नाव पडले. अंधारबन जंगल ट्रेक हा पर्यटकांचा आवडता ट्रेक, धुके, खोल दरी, पाऊस, ओढे, धबधबे हे सर्व या जंगल ट्रेकमध्‍ये पाहून डोळयांचे पारणे फिटते.
ताम्हिणीचे दीपाचे दाट जंगलांतून रात्रीचे ट्रेक करताना किररर अंधारांत दिसणारी काजव्‍यांची चमक, काजवा नृत्‍याचा साक्षात्‍कार करतात. अशा अनेक ठिकाणी काजवा महोत्‍सव भरवले जातात. एकोले लोटस पॉईंट उंचावरुन पाणी पडल्‍याने टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने तयार झालेले धबधबे, उन्‍हाळयातही पाण्‍याने काठोकाठ भरलेले पाण्‍याचे कुंडांमुळे गर्दी असते. डोंगरांतून मुळशी धरणाच्‍या जलाशयाच्‍या कडेने जाणारा सरळ तर कुठे नागमोडी वळणाचा ताम्हिणी घाट लॉंग ड्राईव्‍हसाठी छानच.
पळसे येथील डोंगरातून अनेक छोटे-मोठे पाण्‍याचे प्रवाह एकत्र येत पळसेचा धबधबा तयार होतो. पाण्‍याचा मोठा प्रवाह हे या धबधब्‍याचे वैशिष्‍ट आहे. मुख्‍य
रस्‍त्‍याजवळ असल्‍याने पावसाळयात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. महामार्गाच्‍या जवळच आदरवाडी येथील डोंगरातून उगम पावणारे दोन धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
डोंगरवाडी जवळील दरी मध्‍ये बेरजेच्‍या आकाराचे दरी तयार झाली. त्‍यालाच पर्यटक प्‍लस व्‍हॅली म्‍हणतात. येथे पाण्‍याचे कुंड पहायला मिळतात. याच परिसरात मिल्‍कीबार धबधबा आहे. पाण्‍याचा प्रवाह दगडावर शुभ्र दुधाळ बनतो यामुळे मिल्‍कीबार धबधबा नाव पडले आहे. तर याच प्‍लस व्‍हॅलीच्‍या कुंडातून खाली पडणा-या पाण्‍यामुळे प्रसिध्‍द देवकुंड धबधबा तयार होतो. रिंग वॉटर फॉल शेकडो वर्षे पाण्‍याच्‍या प्रवाहामुळे दगडाला गोल रिंगच्‍या आकार आल्‍याचे या धबधब्‍याचे परिसरात अनेक ठिकाणी दिसुन येते. या रिंग मधुन पास होत पर्यटक पाण्‍याच्‍या प्रवाहाचा आनंद लुटतात.
पेठशहापुर-आंबवणेचा कोराईगड हा किल्‍ला लोणावळयाजवळ असल्‍याने शनिवार, रविवार सुटीच्‍या दीवशी पर्यटकांचा मोठया प्रमाणात राबता असतो. पेठशहापुर, आंबवणे अशा दोनही गावांतून किल्‍लावर जाता येता. सहारा सिटी अॅंबी व्‍हॅली याच परिसरात वसवण्‍यात आली आहे.
अॅंबी व्‍हॅलीतून परवानगी घेऊन पाय-यांनी किल्‍ल्‍यावर जाता येते. अवघड श्रेणीतील नसल्‍याने लहानांसह, जेष्‍ठ नागरीकही क्षमतेनुसार किल्‍ल्‍यावर जाऊ शकतात.
किल्‍ल्‍यावरचे सपाट विस्‍तीर्ण पठार, शाबुत तटबंदी, पाण्‍याचे दोन तलाव, लहान-मोठया लोखंडी तोफा, बुरुंज, गडदेवता कोराई देवीचे मंदीर, गणेश मंदीर
अशा अनेक गोष्‍टी पाहता येतात.
एकोलेचा घनगड गोमुखी रचनेचे प्रवेशद्वार, कातळातून निसटलेला कडा, खांबयुक्‍त पाण्‍याचे टाके, दोनमजली रचनेचा बुरुज, भुयारी टाके, नैसर्गिकरित्‍या मारखिंडीमध्‍ये झालेली दगडांची ठेवण, वाघजाई देवीची मुर्ती, कातळात कोरलेले पाण्‍याचे टाके पाहता येतात. गडावरुन सुधागड, सरसगड, सुरगड, तैलबैला हे किल्‍ले दिसतात.
वाघजाई घाट, सवाष्‍णी घाट, माणदान घाट, घोणदांड घाट, निमखोडयाची खिंड, गणेश खिंड, लिबाईचे सुळके, घोण्‍या डोंगर, नाळीची वाट, डे-याचा घाट, गाढवलोट, किवनी पठार द-या नदी, घोडेजीन घाट, चिमादेवीची व्‍हळ दीसतात. खडसांबळे लेणी, थणाळे लेणी येथे जाता येते.
वडुस्‍तेचा कैलासगड पावसाळयाच्‍या शेवटी, हिवाळा, उन्‍हाळयात कैलासगडावरुन मुळशी धरणाचे विहंगम दृश्‍य डोळयांचे पारण फेडते. टेहळणीसाठी वापरण्‍यात आलेल्‍या या गडावर पाण्‍याचे टाके, शिवमंदीर, जुन्‍या घरांची जोती पाहता येतात. गडावर जाण्‍यासाठी पाय-या नसुन अवघड, निसरडया पायवाटेने जावे लागते.
तैलबैलाचे नैसर्गीकरित्‍या तयार झालेले कातळ सुळके प्रस्‍तरोहणाची आवड असलेल्‍या गिर्यारोही, पर्यटकांना आकर्षित करतात.
सवाष्‍णी घाट, सावळया घाट, मारखिंड ही अनुभवी ट्रेकर्ससाठीची वेगळी वाट.
गावाकडील आख्‍यायिकांनुसार महाभारतातील घटोत्‍कचाचे जन्‍मगाव घुटके(ता.मुळशी) सांगितले जाते. येथील नवरा नवरीचा डोंगर म्‍हणजे पांडवामधील भीम व राक्षसी हिडींबा यांच्‍या विवाहाचा हा प्रसंग असल्‍याचे पुर्वापारपासून सांगण्‍यात येत आहे.
पर्यटनात वाढ हॉटेल व्‍यवसाय तेजीत पर्यटनामुळे हॉटेल व्‍यवसायातुन तरुणांना चांगला रोजगार मिळत आहे. पावसाळयात वर्षाविाहारासाठी ओळखल्‍या जाणा-या पर्यटन स्‍थळांच्‍या जवळची हॉटेल्‍स चांगली कमाई करतात. तेच ट्रेकिंगसाठीच्‍या घाटवाटा, किल्‍ले, ठिकाणे येथे हिवाळयातही चांगला व्‍यवसाय होतो. कॉटेजेसना मागणी
पर्यटन व्‍यवसायात वाढ होत असल्‍याने पर्यटकांच्‍या मागणीप्रमाणे सेवा देण्‍याकडे व्‍यवसायिकांचा ओढा आहे. स्‍वच्‍छ प्रसाधनगृहे, कौटूंबीक वातावरण, प्रशस्‍त परिसर, जनरेटर, इनव्‍हर्टर सुविधा, चवीष्‍ट जेवण अशा दर्जेदार सुविधांची पर्यटकांना अपेक्षा आहे. या सर्व सोयींनी परिपुर्ण कॉटेजेसने खुप मोठी मागणी आहे. त्‍यामुळे मोठया इमारतींपेक्षा स्‍वतंत्र कॉटेजेस बांधण्‍याकडे व्‍यवसायिक लक्ष देत आहे.
टेंटस ट्रेकींग करणारे युवक, युवती, ट्रेकर ग्रुप यांचा ट्रेकींग पॉंईंट जवळ मुक्‍काम करुन निसर्ग अनुभवण्‍याचा मानस असतो. त्‍यानुसार कापडी टेंट (तंबु) मध्‍ये स्लिपींग बॅग, ब्‍लॅंकेट, उबदार कपडे आदी सोयी असल्‍याने शेकोटी पेटवून रात्रभर गप्‍पा मारत, आकाश, चांदण्‍या न्‍याहाळणारा वर्गही मोठया प्रमाणात आहे.
स्विमींग पुल असलेल्‍या बंगल्‍यांना मागणी शहराच्‍या गजबज गोंगाटापासून दुर डोंगरांमध्‍ये शांत ठिकाणी एकांतात असणा-या, सुरक्षित बंगलोंना मोठी मागणी आहे. सांघिक खेळांसाठी छोटेसे मैदान, गवताचे हिरवे लॉन, लॅंन्‍डस्‍केपींग केलेले झाडे, वेलींनी सजवलेल्‍या बंगलोंना सहकुटूंब, ग्रुप, जोडीने येणा-या पर्यटकांना
अशा ठिकाणी सर्व आधुनिक सुविधांसह पाण्‍याचा आनंद लुटण्‍यासाठी स्विमींग पुल असावा याची पर्यटकांकडून खात्री केली जाते. त्‍यासाठी थोडे जास्‍त पैसे मोजण्‍यास पर्यटक तयार असतात.
  • घुटके (ता.मुळशी) : महाभारतातील पांडवापैकी भिम व राक्षसी हिडींबा यांचे विवाहाची आख्‍यायिका असलेला नवरा-नवरीचा डोंगर.
  • कैलासगड (ता.मुळशी) : पावसाळयात गडावर फुलणारी टोपली कारवी.
  • कैलासगड (ता.मुळशी) : पावसाळयात गडावरुन दीसणारे मुळशी धरणाचे परिसराचे विहंगम दृश्‍य.
  • एकोले (ता.मुळशी) : मुळशी धरण भागातील घनगड किल्‍ला.
  • एकोले (ता.मुळशी) : घनगड किल्‍ल्‍याजवळील खिंडीत एकावर एक दगडी रचल्‍याप्रमाणे नैसर्गिकपणे तयार झालेली ट्रेफा खडकांची दुर्मिळ भिंत.
  • पळसे (ता.मुळशी) : पावसाळयात पर्यटकांचे मुळशीतील आवडते ठिकाण पळसे धबधबा.
  • आदरवाडी (ता.मुळशी) : येथील डोंगरांमधील जुळे धबधबे.
  • तैलबैल (ता.मुळशी) : नैसर्गिकरित्‍या तयार झालेले कातळ सुळके प्रस्‍तरारोहकांना आकर्षित करतात.
  • पिंपरी (ता.मुळशी) : कुंडलिका दरीत उगम पावणारी कुंडलिका नदी.

backtotop