हेमंत ववले
काय तुम्ही मुळशी पॅटर्न अस वाचल का? मुळशी शब्द कानावर आला किंवा वाचला तर आपोआप मागोमाग मनात उमटतो तो शब्द म्हणजे मुळशी पॅटर्न. बरोबर ना?
अख्ख्या जगात आपल्या तालुक्याचे नाव या चित्रपटामुळे पोहोचले. कुणाला जर मी मुळशीचा आहे असे सांगितले तर लोक भुवया उंचावुन विचारतातच की मुळशी पॅटर्न मधील मुळशी का? या आधी पुण्या-मुंबईतील लोकांना मुळशीची जी ओळख आहे ती तर अजुनही तशीच आहे. मी मुळशीचा आहे असे ऐकल्यावर अनिष्ट प्रवृत्तीचे लोक माझ्या पासुन हातभर लांबच थांबतात, एवढी दहशत मुळशी या नावात आहे. पण मुळशीची अशी ओळख घेऊनच काय आपण कायम स्वरुपी राहणार आहोत.
पुणे शहरापासुन अगदी हाकेच्या अंतरावर असणारा आपला तालुका निसर्गदत्त अनंत देणग्यांची खाण आहे. पावसाळी मोसमात देशात सर्वात जास्त पाऊस पडणा-या स्थळांमध्ये मुळशी दरवर्षी पहिल्या एक दोन स्थानांवरच असतो, मागील वर्षी तर मुळशीतील ताम्हिणी अभयारण्य परिसरात चेरापुंजी पेक्षाही जास्त पावसाची नोंद आहे. या सोबतच आपला तालुका जगातील सर्वात जुन्या अशा पश्चिम घाटाच्या माथ्यावर वसलेला असल्याने, जगातील अत्यंत दुर्मिळ होत चाललेल्या अशा जैवविविधतेचे देखील घर आहे.
ताम्हिणी सद्य स्थितीमध्ये अभयारण्य म्हणुन घोषित करण्यात आलेला प्रदेश आहे. आपल्या दृष्टीने ही बाब खुप चांगली आहे. सद्यस्थितीमध्ये देखील ताम्हिणी व परिसर पर्यटकांचे आकर्षण आहेच. सामान्य पुणे-मंबईकरांना मुळशीतील पळसे धबधबा हाच काय तेवढा माहीती आहे. आणि तो एकच धबधबा पाहुन, त्यात न्हाऊन त्यांना स्वर्गात आल्यासारखे वाटते. वाटणारच कारण शहरांमध्ये प्रदुषण, गर्दी आणि जीवघेणी स्पर्धाच इतकी आहे की पळसे धबधब्यावरील गर्दी देखील अनेकांना सहज सहन होते. पावसाळ्यात मुळशी शहरवासीयांचे वीकएंड डेस्टीनेशन बनुन जाते.
येणा-या पर्यटकांपैकी बहुतकरुन एका दिवसासाठीच मुळशीत येतात, म्हणजे सकाळी शहरातुन निघायचे व संध्याकाळी रात्रीपर्यंत घरी पोहोचायचे. या एका दिवसाच्या पर्यटनात देखील मुळशीतील स्थानिकांना व्यवसाय करण्याची व रोजगार कमाविण्याची संधी मिळते. मका विकणारे, चहा, वडापाव असे रस्त्याच्या कडेला दुकाने, टप-या लावुन व्यवसाय करणारे शेकडोंच्या संख्येत पावसाळ्यात दिसुन येतात. बाकी व्यवस्थित पंजाबी, महाराष्ट्रियन, कॉन्टीनेंटल असे जेवण देणारी हॉटेल्स देखील आहेतच. याही पुढे जाऊन रीसॉर्ट्स देखील मुळशी परिसरात खुप आहेत. एकुण पर्यटनातुन जो काही व्यवसाय होत असावा मुळशी मध्ये त्याच्यातील केवळ पाच ते दहा टक्क्यांइतकाच स्थानिक मुळशीकरांच्या वाट्यास येतो आहे. आणि तो देखील केवळ पावसाळ्यातील तीन महिनेच. बाकीचे वर्ष पर्यटन व्यवसाय सुरु असतोच पण मुळशीकर मात्र यापासुन वंचित राहतो. इथे स्थानिक व बाहेरचा व्यावसायिक असा भेद करणे या लेखाचा हेतु नसुन, ग्रामीण युवकांना नवनवीन रोजगार संधी पर्यटनाच्या माध्यमातुन कशा निर्माण करता येतील या विषयी सविस्तर मांडणी करणे हा आहे, हे लक्षात असु द्यावे.
तर वर्षभर पर्यटन व्यवसाय चालेल यासाठी पुरक वातावरण कसे आहे ते आपण आधी पाहुयात.
शहरापासुन अंतर – सर्वात जवळचे मेट्रोपॉलिटन शहर म्हणजे पुणे. पुणे शहराची लोकसंख्या कित्येक कोटींच्या घरात पोहोचली आहे. पुणे शहरातील मेट्रो पॉलिटन म्हणजे बहुभाषिक, बहुदेशीक, बहुसांस्कृतिक रहिवाशी शहरात नोकरी व्यापार उदीम करतात. सोबतच पुण्याचा असा एक चोखंदळ खर्च करणारा वर्ग आहेच की जो हौशी आहे. या सर्वांना काय केवळ पावसाळ्यातच ‘ब्रेक’ हवा असतो?
बरं, काय फक्त पुणे शहरतीलच लोकांनाच अशा ‘ब्रेक’ ची गरज असते? तर नाही अगदी सगळ्याच शहरातील लोकांना याची गरज असते. त्यातही आपणास मुंबई देखील त्यामानाने खुपच जवळचे व इथे पोहोचण्यासाठी सोयीचे शहर आहे. केवळ मुंबईच नाही तर भारतातील अन्य शहरे देखील आपल्याला आता तशी फारशी दुर राहिलेली नाहियेत. विमान मार्गाने हे भारत, जग खुपच जवळ आले आहे. प्रवासासाठी लागणारा वेळ खुपच कमी झालेला आहे.
आमचे स्वतःचे उदाहरण देतो. आमच्या निसर्गशाळा या निसर्गपर्यटन व्यवसायात आम्हाला असे अनुभव देखील आले आहेत की लोक हैद्राबाद, सोलापुर, मुंबई, दिल्ली, बॅंगलोर, गुजरात, राजस्थान, इतक्या लांबुन देखील खास आमच्या मार्फत दिला जाणारा अनुभव घेण्यासाठी येतात. एकदा तर एक कुटूंब हैद्राबादेतुन चक्क चारचाकी गाडी चालवत आमच्याइथे , केवळ आमच्या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी आले. अशी अनेक उदाहरणे आहेत.
त्यामुळे शहरापासुनच चे अंतर व लागणारा वेळ या संदर्भात विचार केला तर आपला तालुका अशा पर्यटनासाठी अगदी अनुकूल आहे यात शंका कुणाच्याही मनात नसावी.
पर्यटन गावागावांत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल?
निसर्ग, कृषि, ग्रामीण संस्कृती, परंपरागत ज्ञान, जैवविविधता, औषधी वनस्पती, रानफुले, रानभाज्या, गावाकडील अस्सल खाद्य संस्कृती, खगोल पर्यटन, साहसी पर्यटन, निसर्गपर्यटन, ग्रामपर्यटन, अशा अनेक प्रकारे आपण पर्यटन विकासाकडे पाहु शकतो.
ता-यांचे गाव!
एक उदाहरण घेऊयात. समजा मुळशीतील एखादे गाव अशा पध्दतीने वसले आहे की त्या गावाला चहुबाजुंनी डोंगरांनी वेढलेले आहे. त्या गावात लोकवस्ती कमीच असुन, रात्रीचा कृत्रिम दिव्यांचा प्रकाश देखील खुपच कमी आहे. अशा गावातील तरुणांनी आकाशातील नक्षत्रांचे जुजबी ज्ञान दिले गेले तर शहरांतुन आवर्जुन पर्यटन पावसाळ्याव्यतिरिक्त देखील केवळ ता-यांनी गच्च भरलेले आकाश पाहण्यासाठी इथे येऊ शकतात. शहरांतील लोकांना, मुलांना उघड्या डोळ्यांनी तारे पहावयास मिळतातच कुठे आजकाल. शहरच काय पण आपल्या गावांकडे ही रात्रीच्या दिव्यांचा झगनगाट इतका जास्त झालेला आहे पिरंगुट, पौड सारख्या गांवातुन, शिवारांतुन देखील तारे अजिबात दिसत नाहीत. या मध्ये केवळ तारे दाखवणे ही एकच संधी नसुन, मुक्कामाची सोय, जेवण-खाण ची सोय यातुन देखील व्यवसाय संधी उपलब्ध होऊ शकते. ठरवुन काही गावे अशा पध्दतीने विकसित करता येऊ शकतात की ज्या गावांतुन असंख्य तारे दिसु शकतात. जाणिवपुर्वक, वीजेचे दिवे अशा पध्दतीने लावणे की त्यांचा प्रकाश केवळ खाली जमिनीच्या दिशेनेच पडेल व प्रकाश देखील पांढरा नसेल. यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन, सामंजस्याने असे काही निर्णय करावे लागतील. कित्येकदा, फार्म हाऊस बांधणारे लोक, रीसॉर्ट्स बांधणारे व्यावसायिकच त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीच्या परिसरात व बाहेर राखणदारी सोपी व्हावी म्हणुन मोठ मोठे प्रकाशझोत लावतात व तेच अधिकच्या प्रकाश प्रदुषणास कारणीभुत असतात. एकेकाळी पुण्याजवळील चांदणी चौकातुन खुप सारे तारे दिसायचे, चांदण्या दिसायच्या, व त्यामुळेच या चौकास चांदणी चौक असे नाव पडले. पण आता अगदी ताम्हिणी पर्यंत जरी गेले तरी तुम्हाला मोठ मोठे प्रकाशझोत दिसतील पण तारे मात्र दिसणार नाहीत. स्थानिक तरुण, गावातील नेतेमंडळी, ग्रामपंचायती, प्रशासन, तालुक्यातील शीर्ष नेतृत्व अशा सर्वांनी एकत्र येऊन यासाठी जाणिवपुर्वक काम केले तर आणि तरच हे होऊ शकेल. आणि यात अवघड असे ही काही नाही. ज्यांनी ज्यांनी अधिकचे प्रकाशझोत लावले आहेत त्यांना त्यांना विनंती करुन ते बदलण्यास लावणे. असे केल्याने तारे सर्वांनाच दिसणार आहेत. फार्म हाऊस वाल्यांना देखील आणि रीसॉर्ट मधील पर्यटकांना देखील. तारे दिसणे, पाहणे म्हणजे निसर्गाच्या, या अफाट विश्वाच्या कोडे सोडवण्याकडील पहिले पाऊल होय. मनुष्य निसर्गापेक्षा वेगळा नाही, तो निसर्गाचाच एक भाग आहे , व या महान, विस्तीर्ण आकाशगंगांच्या पसा-यात आपले अस्तित्व एका क्षुद्र धुळीच्या कणा पेक्षाही कमी, क्षुल्लक आहे तर मग मारे स्वार्थ करण्यात, लांड्या लबाड्या करण्यात, भ्रष्टाचार करण्यात, हेवेदावे करण्यात, जीवघेणी स्पर्धा करण्यात हाशिल ते काय? असा स्वाभाविक प्रश्न आकाशदर्शनातुन, खगोल पर्यटनातुन मनुष्यास पडतोच पडतो.
असे ता-यांचे गाव करण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे अनेकाम्च्या प्रयत्नांची गरज आहे. सोबतच असे उत्साही , नवनवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक तरुणांची गरज आहे की जे आकाशदर्शन, खगोल शिकतील. पण यांना शिकविणार कोण बरे? तर आम्ही म्हणजे निसर्गशाळा ही जबाबदारी घेण्यास उत्सुक आहोतच.
जसे ता-यांचे गाव होऊ शकते, तसेच पर्यटनातील अन्य अनेक आयाम खुले आहेत. ते काय काय असु शकतात हे मी वर लिहिले आहेच. व प्रत्येक आयामामध्ये होतकरु तरुणांना प्रशिक्षण आम्ही देण्यास तयार आहोत.
यासोबतच आपण एक गोष्ट आवर्जुन केली पाहिजे , ती म्हणजे पर्यटनाच्या नावाखाली दारु पाटर्यां करणा-या हुल्लडबाजांपासुन आपला पर्यटन व्यवसाय वाचवणे. अनेक ठिकाणी पर्यटनाचे व्यवसाय काही स्थानिकांनी सुरु केले आहेतच पण त्यांच्या कडे येणारे ग्राहक हे पर्यटक नसुन, अस्सल दारुबाजच असतात. त्यामुळे असे ग्राहक शाश्वत पर्यटन विकासासाठी अडथळे आहेत हे आपण समजुन घेतले पाहिजे.
तालुक्यातील सर्व सुज्ञ लोकांनी, नेत्यांनी, तरुणांनी, प्रशासकिय अधिका-यांनी असा वेगळा विचार केला तर काही वर्षांतच मुळशी पर्यटन हा शब्द रुढ झालेला आपण पाहु शकतो.
टोपली कारवी
स्थळ – कैलासगड , मुळशी
ही कारवी शब्दश: टोपली सारखी दिसते. प्रत्यक्ष पाहण्यासाठी हे दृष्य खुपच सुंदर आहे. विशेषतः जर मोसमी पावसाचे ढग, तुमच्या अंगाखांद्याला स्पर्शुन जात असताना, पांढुरक्या ढगांच्या दाटीत टोपली कारवीचे हे ताटवे अतिशय मनमोहक वाटतात. हे खुप सुंदर दृश्य आहे..
पर्यावरणदृष्टय़ा ही वनस्पती महत्त्वाची आहे. या वनस्पतीची मुळे जमिनीत खोल कंदासारखी पसरलेली असतात आणि एकमेकांजवळ दाटीवाटीने उगवत असल्याने उतारावरील मातीची धूप कारवीमुळे रोखली जाते. यामुळे पर्यावरणामध्ये कारवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे
इथे पोहोचणार कसे ?
पुण्याहुन, पौड-मुळशी मार्गे, निवे गावी जावे. निवे गावाच्या थोडे पुढे गेल्यावर एक रस्ता लोणावळ्याकडे वळतो, तो रस्ता घेऊन, वांद्रे -वडुस्ते गावाच्या दिशेने जावे. वडुस्ते गावाच्या पश्चिमेचा डोंगर म्हणजेच कैलास गड. यास घोडमांजरीचा डोंगर असे देखील म्हणतात.
सार्वजनिक वाहन व्यवस्था भरवशाची नाही. त्यामुळे स्वतःचे वाहन नेणे बरे. सध्या पुणे कोलाड रस्त्याची अवस्था खुपच खराब असल्याने, वाहन चालवताना हाल अपेष्टा सहन करण्याची मानसिकता असेल तरच इकडे फिरायला या.
सामान्य नाव: कारवी
वानस्पतिक नाव: प्लीओकॉलस रिची
कुळ: अकँथसी
समानार्थी नाव: स्ट्रोबिलँथेस सेसिलिस
एक लहान बहुवर्षीय झुडूप, सहसा अर्धा मीटर उंच असते, परंतु फुलांच्या वर्षानंतर ते २ मीटरपर्यंत वाढते.
अनेक चतुर्भुज देठ जमिनीवर अर्धगोलाकार गुच्छ तयार करतात. समोरासमोर मांडलेली देठविरहित पाने अंडाकृती, तळाशी गोलसर, २-३ सेमी लांब असतात. जांभळ्या रंगाची फुले ३-८ सेमी लांब मंजिऱ्यांमध्ये, पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास येतात. काटेरी छद २ सेमी लांब असतात, त्यावर लांब केस असतात आणि ते जांभळ्या छटेसह असतात.
सह्याद्रीतील फुले काहीतरी सांगतात, काय आपण ते ऐकु शकतो?
धन्वंतरी पुजनामध्ये खाली मंत्र म्हंणण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. श्रीमत भागवतामध्ये (३/१५/१९) मध्ये सदर श्लोक पहायवयास मिळतो.
सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै
पुन्नाग जाती करवीर रसाल पुष्पै:|
बिल्वप्रवाल तुलसी दल मालतीभिस्त्वां
पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद
यात अनेकविध फुले तसेच वनस्पती, वृक्षांचा उल्लेख येतो. व या व अशा प्रकारच्या फुलांच्या समर्पणाने जगदीश्वर प्रसन्न (प्रसन्न म्हणजे आनंदीत) होतो. अशा आशयाचा हा श्लोक आहे. याचा अर्थ फुले समर्पण भाव जागा करु शकतात असा होतो.
लहान मुलांच्या निरागस, निर्लोभ स्वभावाला अनेकदा आपण फुलांची उपमा देतो. इथुन तिथुन सगळ्या संस्कृत्यांमध्ये फुलांना अनन्य साधारण महत्व आहे. सांप्रदायिक असो वा अन्य काहीही प्रसंग असो. फुले मनुष्य जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे. भारतीय संस्कृती मध्ये तर सोळा संस्कार पैकी जवळ जवळ सगळ्याच संस्कारांमध्ये फुलांना अनन्य साधारण महत्व आहे. अगदी गर्भाधाना पासुनते अगदी अग्नीसंस्कारापर्यंत सगळीकडेच फुले खुप महत्वाची भुमिका पार पाडतात. भुमिपुजन असो वा वास्तुशांती की गृहप्रवेश..फुले सगळीकडेच. हेच काय तर फुलांच्या अभावी जर मंत्राद्वारे भगवंताची प्रार्थना करायची असेल तर त्या मंत्रांना नुसते मंत्र न म्हणता मंत्र पुष्पांजली म्हणतात. आस्तिक असो वा नास्तिक फुलांनी सर्वांना मोहुन टाकलेले दिसते.
युगल प्रेमाच्या आविष्कार अभिव्यक्तिसाठी फुलांच्या इतके प्रभावी माध्यम अजुनही आधुनिक विज्ञानाला सापडले नाही.
कुणास शुभेच्छा द्यावयाच्या असतील तरीही भेटवस्तु सोबत आपण पुष्पगुच्छ देतो. अगदीच भेटवस्तु शक्य नसेल तर फुल न फुलाची पाकळी तरी देतोच. श्रीमंत असो व गरीब फुले साथ सर्वांनाच देतात. फुलांचे मानवी जीवनातील महत्व अनन्यसाधारण आहे यात दुमत नसावे. असो.
आम्ही निसर्गशाळेच्या माध्यमातुन मागील दोन तीन महीन्यांमध्ये सह्याद्रीमध्ये अनेक पदभ्रमण व निसर्गसहलींचे आयोजन केले. तसे आम्ही नेहमीच करीत असतो. पण मागील दोन तीन महिन्यांचे विशेष असे आहे की वर जे फुल महात्म्य मी गायिले त्या फुलांचा साक्षात्कार , त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मला झाला. व फुलांचे नयनरम्य, मनोहर व देहभान हरवणारे रुप अनुभवास आले. माझ्या मागील काही लेखांमध्ये देखील ह्या फुलांच्या साक्षात्काराचा उल्लेख कमी अधिक झालेला आहेच. पण अगदी अलीकडच्या म्हणजे मागील आठवड्यातील निसर्ग सहलींमध्ये फुलांच्या फुलण्याचा परमोच्च काळच असेल वाटले.
तसे आपणास सह्याद्रीतील फुले म्हंटले की कास पठार आठवतेच आठवते. आणि का नाही आठवणार. कास पठार व त्यावरील पुष्पोत्सव आहेच मुग्ध करणारा. मागच्या आठवड्यातील सहलीमध्ये तर मी तोरणा किल्ला जांभळा झालेला पाहीला. तोरण्याचा पश्चिमेकडील कडा आणि आणि बुधला माची व तिचा उतार सगळेच्या सगळे जांभळ्या तेरड्याने रंगवले होते. अशी अनेक अतिसुंदर दृश्ये मला पहावयास मिळाली. माझे अजुन कास पठार पाहणे झालेले नाही. पुढच्या वर्षी नक्की जाणार कास ला. पण आमच्या निसर्गसहलीतुनच मला सह्याद्रीच्या ह्या फुलांच्या रंगबाजीचा साक्षात्कार झाला. हे ही नसे थोडके.
सह्याद्रीतील रंगांची उधळण लेखाच्या शेवटी असलेल्या लिंक वर क्लिक करुन पहा..
का बर देवाला फुले वाहीली जात असतील? का प्रियकर प्रियसीला फुल च देत असेल? का शुभेच्छा देताना फुलांचाच उपयोग केला जात असेल? फुलांना एवढे महत्व मानवी जीवनामध्ये का बर प्राप्त झाल असेल ?
हि रंगीबेरंगी फुले आपल्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना? नक्की काय संदेश मिळतो फुलांकडुन मानवास?
माझ्या आकलन आणि पृथ्थकरण करण्याच्या सीमीत क्षमतेवर मला वाटते की ही फुल दोन परस्पर विरोधी संदेश मानवास देतात. पहीला म्हणजे अनित्यता व दुसरा म्हणजे नित्यता.
अनित्यता – फुले फार कमी कालावधीत संपतात. म्हणजे ती फुले राहत नाहीत. सुकुन जातात. त्यातील सौंदर्य , सुगंध , रंग सगळे काही संपते. फुल म्हणुन जे काही अस्तित्वात असते ते संपते. तद्वतच आपण देखील परमेश्वराला भेटायला जाताना, जणु फुलांप्रमाणेच नश्वर असणारे सगळे काही जणु परमेश्वराचे चरणी अर्पण करुन जे कधी ही नष्ट होणार नाही असा ईश्वर जवळ करतो. हे करताना आपल्या मनी हा भाव उत्पन्न व्हायला हवा की आपण कितीही प्रयत्न केले तरी आज जे भौतिक सुख किंवा दुःख अस्तित्वात आहे ते उद्या नसणार आहे. जे काही आहे ते क्षणभंगुर आहे. व हे सारे क्षणभंगुर असणारे त्यागुन जे अविनाशी आहे असे परम तत्व, ब्रम्ह तत्व भाविकाने अंगिकारले पाहीजे असा संदेश ही फुल देत असावीत असे मला आताशा वाटु लागले आहे.
नित्यता – फुलामध्ये अफाट शक्ती आहे. ही शक्ती पुन्हा नव्याने सृष्टीची निर्मिती करीत असते. क्षणभंगुर असणा-या छोट्याशा मर्यादीत कालावधीमध्ये देखील, स्वतचे अस्तित्व सुप्त बीज अवस्थेमध्ये टिकवुन ठेवणे आणि योग्य संधी मिळताच पुन्हा नव्याने नव्या जगाला जन्म देणे ही देखील फुलांची कमाल आहे. मी काही वर्षा पुर्वी पाहीलेला एक ल्युसी नावाचा इंग्रजी सिनेमा पाहीलेला, मला आठवला. जे काही जीवनतत्व (बॉडी सेल्स) आपणा सर्वांमध्ये आहे ते देखील अशाच प्रकारे उत्तरोत्तर अधिकाधिक ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते व हे ज्ञान मिळविण्यासाठी हे जीवनतत्व शरीराची मदत घेत असते. जीवंत राहण्यासाठी सकारात्मक परीस्थीती असेल तर हे तत्व वाढत राहते व ज्यावेळी परीस्थीती नकारात्मक होते त्यावेळी हे जीवनतत्व लाखो करोडो वर्षांचे ज्ञान जे पेंशींमध्ये असते ते ज्ञान टिकवण्यासाठी नवीन बॉडी सेल्स तयार करते म्हणजेच नवीन जीवशास्त्रीय शरीर तयार करते. यास प्रजनन असे म्हणतात. सिनेमा मुळातुनच पाहण्यासारखा आहे त्यामुळे इथे त्याविषयी जास्त लिहित नाही. पण जसे सिनेमामध्ये मानवी ज्ञान-विज्ञानाच्या पिढ्यानुपिढ्या संक्रमनाविषयी संकल्पना मांडली आहे त्याच प्रमाणे सर्व चराचरात देखील हाच प्रवाह दिसुन येतो असे मला वाटते.
स्वतचे अस्तित्व अपरंपार टिकवुन ठेवणे, जितके होईल तितके टिकवुन ठेवणे व त्यासाठी नवनवीन युक्त्या करणे, ज्ञान आत्मसात करणे, व टिकण्यासाठी आवश्यक ते सर्व करणे. पहा ना वटवृक्ष एखादा अगदी शे दोनशे वर्षे जुना असु शकतो. त्याच्या त्या जीवन काळामध्येच तो नवीन पिढी निर्माण करतो, नवीन फुले, बीजे तयार करुन. कारण त्या वृक्षास ( त्या जीवनतत्वास ) टिकायचे आहे. मला सह्याद्रीमध्ये दिसलेल्या त्या असंख्य पुष्प वनस्पतींचे आयुष्य साधारण एका वर्षाचे असते असे दिसुन येते. म्हणजे बीजापासुन रोप, त्याची वाढ व नंतर फुले आणि व पुन्हा बीज या चक्राला साधारणपणे एक वर्ष लागत. त्यामुळे या सर्व पुष्प वनस्पतींना वर्षायु असे देखील म्हणतात. पण खरच नीट विचार केल्यावर समजते की हे आयुष्य केवळ एका वर्षाचे नाहीये. हा एक खुप मोठा प्रवास आहे. जो अनंताकडुन अनंताकडे जातो. अनंत म्हणायचे कारण एवढेच आहे की आपल्या इंद्रीयगम्य ज्ञानाच्या कक्षेत ह्या प्रवासाची सुरुवात व शेवट, येत नाही. माणसाचे देखील यापेक्षा वेगळे ते काय असु शकते?
ह्या दिवाळीच्या निमित्ताने , आपण ही अनेकविध प्रकारे फुलांचा वापर करणार असु. प्रत्येक फुल आपणास हे दोन संदेश देत आहे. हे संदेश स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत का? प्रत्येक फुल आपणास नित्य आणि अनित्य अशी दोन्ही तत्वे सांगत आहे. काय आपण ती ऐकु शकतो?